Tuesday, January 28, 2025

/

फक्त गच्चीत गॅलरीत कडेला उभारुन पाहू नका…सामील व्हा!!!

 belgaum

‘शिवाजी जन्मले पाहिजेत….पण शेजारच्या घरात’ असं बहुजनांच्या संघर्षाच्या स्थितीबाबत म्हटलं जातं.छत्रपतींचा संघर्षाचा वारसा सांगणाऱ्या मराठी बांधवांना मराठी अस्मिता समजावून सांगण्याची वेळ यावी लागते, हा दैवदुर्विलास आहे.सीमा भागातील मराठी माणूस गेली 66 वर्षे कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ झगडतो आहे.लाठ्या काठ्या खातो आहे रक्त सांडतो आहे केसीस अंगावर घेतो आहे .मोठया संख्येने 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होतो आहे.. परंतु काही लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून,दुकानाच्या फळ्यावरून,गच्चीतुन,गॅलरीतुन पहात राहतात.अश्यावेळी एक बाब लक्षात येते की , जी मराठी माणसे लढतात,त्यांना एकाकी पाडण्याचा डाव सरकार आखतं, आणि त्याला खतपाणी हाताची घडी घालून उभारणारी आपली मराठी माणसेच घालतात.

भाषा हे संस्कृतीचे रूप आहे. ज्यांची भाषा टिकली, त्यांची संस्कृती टिकली.ज्या भाषा काळओघात नष्ट झाल्या,त्यांची संस्कृती काय एकंदर अस्तित्वच संपलं. इंग्रजांनी आपली भाषा जगभर जीवंत ठेवली,त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचे गोडवे जगभर गायिले जातात.
बेळगाव ओळखले जाते ते भाषिक संघर्षासाठी.
‘मराठी’चा वसा महाराष्ट्रा पेक्षाही बेळगावने अधिक जपला आहे. मराठी माणसाचा दबदबा आजही बेळगावात गर्जत आहे .बेळगाव जगवलं, जपलं,राखलं मराठी माणसांनीच. मराठी जनांच्या अस्मितेला,गर्वाला किंवा अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न कानडी प्रशासना कडून वेळोवेळी केला जातो.महाराष्ट्रातील नेते सत्तेच्या साठमारीत मशगुल असतानाही., बेळगावचा मराठी माणूस एकाकी लढा देत आला आहे.

Black day file photo
Black day file photo

आता वेळ आली आहे मराठी माणसाने मराठी माणसाचे मनगट बळकट करण्याची.1 नोव्हेंबरचा काळा दिन ही मराठी माणसाची वेदना आहे. आणि त्याच दिवशी कर्नाटक सरकार राज्योत्सव दिनाचा उन्मादी जल्लोष करण्यात मशगुल असते. हा मराठी संवेदनशील मनावर ओढलेला ओरखडा आहे.

 belgaum

सत्तेच्या राजकारणात मराठी माणूस कित्येक ठिकाणी दुभंगला गेला आहे.राजकीय पक्षांनी मराठी माणसाची दौलत लुटली,कार्यकर्त्यांची फळीच्या फळी लाचार बनवली.अश्या वेळी विविध ठिकाणी विखुरलेल्या मराठीं माणसाला आंतरिक तळमळीने म्हणावेसे वाटते, ‘ही मराठी शिवबाची आहे तुकोबाची आहे,ज्ञानोबाची आहे,अमृताते पैजा जिंकणारी आहे.तिच्या अस्तित्वासाठीच्या लढाईत तुम्ही रस्त्यावर आलंच पाहिजे.आपली भाषा टिकवलीच पाहिजे.आपल्या आई वडीलांनी, बापजाद्यानी,संतांनी ,शुरानी, वीरांनी ,शाहिरांनी, लेखकांनी, कवींनी आपल्या विश्वासावर ही आपल्या ताब्यात दिली आहे.तिला मर्दानी, सदृढ बनवलं पाहिजे तिला नटवायला हवं सजवायला हवं आणि साम्राज्यावर बसवलं पाहिजे.

1 नोव्हेंबर रोजी जे सुट्टी घेऊन पिकनिकला जातात, घरात कवंद घेऊन आराम करतात यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते ‘मराठी भाषा ही आपली आई आहे’आईला वृद्धाश्रमात पाठवणारी आपली औलाद नाही.एक तारखेला मनात मन मिळवून घ्या मनगटाला मनगट जोडा,रस्त्यावर उतरा आणि आपल्या भाषेला राज वैभव प्राप्त करून द्या.

म्हणून सांगावसं वाटतं फळीवर गच्चीवर रस्त्याच्या कडेला नुस्तेच पहात उभा राहू नका..आपल्या अस्तित्वासाठी संघर्षात सामील व्हा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.