दिवाळीचा मोसम जवळ आला. आणि बाल मंडळी किल्ला बनवण्याकडे वळली आहेत. सध्या सर्वत्र किल्ला बनवण्याची क्रेझ दिसून येत आहे मात्र दररोज होत असलेल्या पावसाने किल्ला बनवणाऱ्या या चिमुरड्यांचा हिरमोड होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वत्र गड कोट उभारले, मावळे आणि किल्ले हेच त्यांच्या स्वराज्य संस्थापनेसाठीचे महत्वाचे घटक होते. याच किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून त्या जाज्वल्य इतिहासचे स्मरण केले जाते. यामुळेच दिवाळीत किल्ला तयार करण्याची पद्धत रूढ झाली आहे.
मावळे, शिपाई, शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृती आणि कल्पकता यांच्या जोरावर ही किल्ले निर्मिती जोरदार सुरू झाली आहे.
सध्या सारीच बालपिढी या कामात गुंग आहे. मातीचा चिखल करून त्यात आपली कल्पना रंगवली जाते. यातून स्वतःच्या मनाने काही करण्याची भावना तयार होते. जरा मुले मोठी झाली की शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब तयार करण्याचा प्रयत्न करतात. या कलेतून इतिहास तर कळतोच तसेच विविध संस्थांच्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनही मिळून जाते.
लहान मुले दसऱ्याच्या सुट्टी नंतर टी व्ही मोबाईल विसरून किल्ले किल्ले बनवण्याकडे वळली आहेत यावर्षी गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे बाल चमुंच्या किल्ले बनवण्याच्या आनंदावर विरझन पडले आहे.अनेक मुलांनी किल्ले बनवून पावसा पासून संरक्षण करण्यासाठी झाकून ठेवले आहेत. दिवाळीच्या तोंडावर कोसळणारा वरून राजा केवळ शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना नाही तर लहान मुलांना देखील त्रास दायक ठरत आहे.
बाल चमू मातीचा चिखल बनवून किल्ल्याच्या प्रतिकृती तयार करतात त्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ल्यांच्या इतिहासाची जाणीव होते इतकेच काय तर बाल चमुंच्या अंगातील किल्ला बनवताना इंजिनिअरिंग गुणांना देखील वाव मिळतो.ऐतिहासिक किल्ले साकारणाऱ्या प्रोत्साहन म्हणून अनेक संस्था स्पर्धा देखील आयोजित करत असतात एकूणच बेळगाव शहर परिसरात किल्ले बनवण्याची जुनी परंपरा आहे ती पुढे चालत आहे.