बुडाच्या अखत्यारीत येणाऱ्या अठरा पीडीओना कार्यालयीन चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच त्यांना याबाबत नोटिसा बजावण्यात येणार असून सर्व क्रमांकाचे एन करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चौकशीमुळे त्यांच्या बढतीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी याबाबत पावले उचलली असून लवकरच त्यांना कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे संबंधित पिडिओची चांगलीच गोची झाली असून अनेक जण यापासून बचाव करण्यासाठी काही जिल्हा पंचायतीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना पकडून साटेलोटे करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बुडा आणि महानगरपालिकेच्या अखत्यारीत सर्वे क्रमांकाच्या जमिनी एन करून गैरकारभार केल्याबद्दल मागील वेळी त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र काही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अजूनही ही नोटिशीला उत्तर न दिल्यामुळे आता त्यांचे कार्यालय चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची नोटीस त्यांना लवकरच पाठविण्यात येणार असून तातडीने चौकशीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुडा आणि महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक गैरकारभार करून दिशाभूल करण्यातच काही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी धन्यता मानली होती. मात्र आता हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. बुडा व महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी यांना तातडीने नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांची कार्यालयीन चौकशी लवकरच करून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या प्रकारामुळे तालुक्यात मात्र एकच खळबळ माजली असून यापुढेही असे प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करू असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.