बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला असला तरी या स्मार्ट सिटीचा निधी कसा वाया जाईल याकडे मनपा प्रशासनाने अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे अनेकांना त्याची डोकेदुखी वाढू लागली आहे. मनपाने नुकतीच बेळगाव शहरातील पूर्व भागात डस्टबिन उभे केले आहेत मात्र हे डस्टबीन नको त्या ठिकाणी उभे केल्याने कचऱ्याची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.
लाखो रुपये खर्च करून हे डस्टबिन उभे करण्यात आले आहेत. या पूर्वीही टिळकवाडी भागात हे डस्टबिन उभे करण्यात आले. मात्र योग्य त्या पद्धतीने त्याचे नियोजन नसल्याने हे डस्टबिन वाया गेले आहेत. अशीच अवस्था आता पूर्व भागातील डस्टबिनचीही होणार आहे. त्यामुळे मनपाने डस्टबिन उभे करण्याच्या आधी त्याचा आराखडा काढून योग्य त्या ठिकाणी डस्टबिन उभे करण्याची गरज निर्माण होती. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
टिळकवाडी भागात उभे करण्यात आलेले डस्टबिन वाया गेले आहेत. हे डस्टबिन सुका व ओला कचरा यासाठी उभे करण्यात आले तरी यावर कन्नड फलक लिहिल्याने अनेकांची समस्या वाढू लागले आहे. कन्नड बरोबरच मराठी लिहिल्यास अनेक नागरिकांची सोय होणार होती. मात्र ओला कचरा नेमका कोणत्या डब्यात टाकावा आणि सुका कचरा कोणत्या डब्यात टाकावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे डस्टबिन उभे करण्यात येत आहेत. मात्र योग्य त्या ठिकाणी हे डस्टबिन उभे करण्यात न आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कचर्याचे विल्हेवाट लावण्यासाठी जरी हे डस्टबिन उभे करण्यात आले तरी योग्य त्या ठिकाणी त्यांची उभारणी न करण्यात आल्याने नागरिक पुन्हा दररोजच्या ठिकाणी कचरा फेकत असल्याची बाब उघडकीस येत आहे. अशा परिस्थितीत मनपाने ज्या ठिकाणी कचरा टाकण्याची गरज आहे त्या ठिकाणी हे डस्टबिन उभे करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.