हौसेला मोल नाही असे म्हटले जाते. मात्र हीच हौस कधीकधी अनेकांना महागात पडते. त्यामुळे हौस पूर्ण करण्यासाठी अनेकांना त्रास करणेदेखील चुकीचेच आहे. असाच प्रकार खासबाग येथील उपार गल्ली कॉर्नरला घडला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडविण्याचे सामोरे येत आहे.
खासबाग येथील उपार गल्ली कॉर्नरवर लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने संबंधितांनी रात्रभर डॉल्बी लावली होती. मात्र या डॉल्बीमुळे रात्रभर अनेकांना त्रास सहन करावा लागला. हौस मौज करण्यासाठी अनेकांना त्रास देणे चुकीचेच आहे. या प्रकारामुळे सारेजण संतापले होते. मात्र लग्नसोहळा आहे, आडकाठी नको म्हणून काहीजण शांतच राहिले डॉल्बीचा दणदणाट वाढतच होता. त्यामुळे पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी संबंधित डॉल्बी जप्त केली आहे.
डॉल्बीचा आवाज शंभर डिसेबलच्या आत असणे गरजेचे असते. याचबरोबर रात्री दहानंतर डॉल्बी लावणे कायद्याने चुकीचे आहे. या डॉल्बीमुळे रुग्णांना मोठा त्रास होतो. याची थोडीही जाणीव न ठेवता मोठ्या प्रमाणात डॉल्बी लावून आपली हौस पूर्ण करण्यासाठी रात्रभर दणदणाट सुरू होता. परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास झाला. तरीदेखील नागरिकांनी शांत राहणेच पसंत केले होते. मात्र हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे संबंधित डॉल्बी जप्त करून ती पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आली आहे.
रात्रभर डॉल्बीच्या दणदणाटात काही तरुण हिडीस प्रकार करून नाचत होते. मात्र तो भाग संवेदनशील असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू शकले असते. तसे झाले नाही हे चांगलेच असले तरी डॉल्बी लावण्याचे नियम आणि भान संबंधित यांना नसल्याने अनेकांचा संताप अनावर झाला होता. यापुढे आपली हौस पूर्ण करण्यासाठी इतरांना त्रास देणे बंद करून सामाजिक भान बाळगणे गरजेचे आहे. पोलिसांनी डॉल्बी जप्त करून संबंधितावर कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.