बेळगाव शहर आणि परिसरात पथदीप बंद असल्याचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. ही काही नवीन गोष्ट नाही ही नित्याची बाब बनली आहे. बेळगाव चन्नम्मा नगर जवळच असलेल्या सुभाष चंद्र बोस नगर परिसरात पथदिवे बंद असल्याने अनेकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या नगरात उजेड कधी पडणार असा सवाल उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेच्या आंधळ्या कारभाराचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने अनेकांना पथदीपचे कंत्राट दिले आहे खरे मात्र ते सुरळीत सुरु असतात का याची जबाबदारी झटकून दिली आहे. त्यामुळेच अनेकांना अंधारातच पायवाट शोधावी लागत आहे. अशीच परिस्थिती सुभाषचंद्र बोस नगर येथील नागरिकांना सहन करावी लागत आहे. याबाबत विचारले असता आज करतो मी उद्या करतो अशी उत्तरे मिळत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेने ज्यांना कंत्राट दिले आहे ते हातवारे करून आपली जबाबदारी झटकत असल्याची माहिती मिळाली आहे. सुभाषचंद्र नगर परिसरात मागील काही महिन्यांपासून असेच प्रकार सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर असणारे पथदीप बंद असल्याने नागरिकांना ये जा करताना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेची जबाबदारी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. सुभाष चंद्र बोस नगर परिसरात ही बाब नेत्याची ठरल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
शहर आणि उपनगरात हे प्रकार नित्याचे बनले आहेत. त्यामुळे अंधारातच पायवाट काढून नागरिकांना आपल्या घरी पोहोचावे लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी आणि निवेदने देऊन झाले तरी मनपाचे झोपेचे सोंग काही डोळे उघडत नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यापुढे तरी मनपाने ज्या कंत्राटदाराला ही कामे दिली आहेत त्यांनी योग्यरीत्या पार पाडावी अशी मागणी होत आहे. तक्रार केल्यानंतर कंत्राटदार आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून देऊन केवळ दिखाव्याच्या सोंग करून दोन तीन दिवे लावून आपली जबाबदारी संपली असे भासू लागले आहेत. त्यामुळे वारंवार येणारी समस्या कायम असून महानगरपालिकेने अशा तंत्र लिहू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे.