यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कडेकोट पोलीस बंदोबस्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही गुलालाची उधळण करत काही काळ उत्सव एन्जॉय केला.
शुक्रवारी मिरवणूक मार्गात डी सी पी सीमा लाटकर यांनी रहदारी डी सी पी यशोदा वंटगुडी यांना गुलाल लावला पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी ए सी पी भरमनी यांना गुलाल लावला असे करत सर्व अधिकाऱ्यांनीही एकमेकांत गुलाल उधळला.बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत काही काळ आनंद साजरा केला.
खडक गल्लीच्या मिरवणुकीचा गणपतीचा ट्रॅक्टर ए सी पी एन व्ही भरमनी यांनी चालवला या शिवाय महंतेश्वर भरमनी व चंद्रापा या ए सी पी त्रिकूटाने अनेक ठिकाणी सर्वधर्मीय आरतींचे यशस्वी आयोजन करत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता त्याचे पडसाद मिरवणुकीत उमटले शिवाजी नगर मध्ये मुस्लिम बांधवानी मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यामुळं मिरवणूक शांततेत पार पडली आहे.
गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या ठेक्यावर, गणेश भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जल्लोष करत विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढवली. लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.दिर्घकाळ लांबलेली मिरवणूक हेच यावर्षीच्या बेळगावच्या विसर्जन मिरवणुकीचं मुख्य वैशिष्ट्यं ठरलं. तब्बल 27 तासानंतर या मिरवणुकीला पूर्णविराम मिळालाय.
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वषी लवकर या’ च्या गजरात गुरुवारी सायंकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल २६ तासांहून अधिकवेळ लांबली. डॉल्बीच्या दणदणाटात उसत्वाने थिरकणारे युवक आणि इतर अनेक कारणांमुळे विसर्जन मिरवणुकीस विलंब झाल्याचे दिसून आले आहे.
गुरुवारी सायंकाळी अनंत चतुर्दशी दिवशी सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक तब्बल 27 तास चालली. मुख्य मिरवणुकीत 153 गणेश मंडळांनी भाग घेतला होता.गुरुवारी सायंकाळी 4 .30 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौकातील राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पूजन करुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती.