प्राथमिक मराठी शाळांच्या इमारतीत इतर माध्यमाच्या शाळा भरवल्या जात आहेत ही मराठी शाळा मधील घुसखोरी थांबवा अशी मागणी युवा समितीने केली आहे.बुधवारी सकाळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांना निवेदन देत त्यांनी ही मागणी केली आहे.
शहरातील अनेक शाळांमधील शिक्षकांची सक्तीने बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नानावाडी येथील प्राथमिक मराठी शाळेसह इतर शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासणार आहे त्यामुळे ज्या शाळांमधील शिक्षकांची बदली करण्यात आली आहे, त्या शाळेत दुसऱ्या शिक्षकाची कायमस्वरूपी नेमणूक केल्याशिवाय शिक्षकांची बदली करू नये अशी मागणी युवा समितीने केली आहे.
कन्नड शाळांच्या इमारतीला गळती लागल्याचे निमित्त करून मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळांचे स्थलांतर केले जात आहे याचा विरोध करीत ज्या मराठी शाळांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्यात आली आहे त्या शाळा पुन्हा नव्या इमारतीत कधी सुरू करणार याबाबत लेखी आश्वासन देण्यात यावे तसेच लेखी आश्वासन दिल्यानंतर योग्य वेळेत मराठी शाळेतुन कन्नड शाळेचे स्थलांतर केले नाही तर आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा देखील निवेदनात दिला आहे.
सदर निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या त्वरित सोडवाव्यात ही विनंती सदरचे निवेदन देताना संबंधित अधिकारी जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ करत होते तेव्हा युवा समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता आणि जर येत्या दोन महिन्यात समस्या निवारण केल्या नाही तर कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना म.ए.समिती जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी शिक्षण खात्याच्या अनागोंदी कारभारावर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, समिती नेते आर.आय.पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, किशोर मराठे, विशाल गौडांडकर, वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील, विजय जाधव, किरण हुद्दार, नागेश बोबाटे, विनायक कावळे, रणजित हवळणाचे आदी उपस्थित होते.