बुडा हद्दीत सर्वेचे एन ए करणाऱ्या अकरा पीडीओना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना तर चांगलीच धडकी भरली असून त्याचे उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या नोटिसामुळे तालुक्यातील सर्व सर्वच पीडीओ यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता चांगलाच फटका बसणार आहे.
2013 साली ते 2019 पर्यंत ज्याने सर्वे क्रमांकाचे एनए करून बक्कळ माया जमवली आहे अशा पीडिओची पाचावर धारण बसली असून जिल्हा पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र यांनी या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसामुळे अनेकांची भंबेरी उडाली आहे. अनेक पीडिओनी वरिष्ठ अधिकार्यांचा सल्ला घेऊन नोटिशीला उत्तर देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील 11 ग्रामपंचायती बुडा हद्दीत येतात. या बुडा हद्दीतील सर्व क्रमांकाचे एन ए करून संगणक उतारे दिल्याच्या घटना वारंवार उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे बुडाला जमीन काबीज करण्यासाठी जागा उरली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याची दखल घेऊन जिल्हा पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या नोटिसा बजावल्या आहेत.
2013 पासून कोणकोणते पीडीओ या अकरा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते त्यांनाही धारेवर धरण्यात येणार आहे. लवकरच त्यांची चौकशी होणार अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या पीडिओना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून जर पंधरा दिवसात नोटिशीला उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या पीडीओना चांगलीच धडकी भरली आहे.
जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकार्यांचेही आता या नोटीसमुळे चांगलीच गोची होणार आहे. काही पीडिओनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरूनच हा सारा कारभार केल्याची माहिती उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावून अनेकांना दिलासा दिला असला तरी यापुढे सर्व क्रमांकाचे संगणक उतारे काढून एनएत रूपांतर करणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पीडिओना आता वाली कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.