बेळगाव हुन गोव्याला जाण्यासाठीचा महत्त्वाचा मार्ग मानला जाणाऱ्या अनमोड घाटातील रस्ता मागील 8 महिन्यापासून बंद आहे. फक्त गणेश चतुर्थीसाठी तो सुरू करण्यात आलेला होता.
आता या रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकोन कंपनीने गेल्या चार दिवसांपासून कामास प्रारंभ केला असून चार चाकी वाहने रस्त्यावरून ये-जा करत असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने बुधवार दिनांक 18 पासून कर्नाटक हद्दीत चर मारून हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. या कंपनीचे व्यवस्थापक सोमी यांनी माहिती दिली आहे.
हा मार्ग दोन महिन्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चार चाकी वाहने घेऊन जाणे कठीण होणार आहे. त्याचा त्रास टाळण्यासाठी कॅसरलोक पर्यंत काम पूर्ण करून त्यानंतर चार चाकी चाकी वाहनांसाठी मार्ग एकेरी पद्धतीने खुला करण्यात येणार आहे.
हा मार्ग बंद झाल्यामुळे बेळगाव मार्गे गोवा वाहतूक बंद होणार असून त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून पुन्हा बेळगाव चोर्ला मार्गावरील ताण वाढू शकतो. मात्र बेळगाव चोर्ला मार्गावरील कुसमळी जवळचा ब्रिज धोकादायक असल्यामुळे तेथील वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. याची दखल आता संबंधित प्रशासनाने घेण्याची गरज आहे.