देशाला स्वातंत्र्य मिळाले हा दिवस 15 ऑगस्ट म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र उचगाव येथील एका उर्दू शाळेत 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाई करावी व त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी उचगाव येथील तालुका पंचायत सदस्य मधुरा तेरसे यांनी केली आहे. या मुद्द्यामुळे सभागृहात एकच गोंधळ माजला.
तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत हा विषय मांडण्यात आला. सदस्य उदय सिद्धांनावर, सुनील अष्टेकर यांच्यासह इतर सदस्यांनी हा मुद्दा ऐरणीवर घेत हा तर देशाचा अवमान असून देश द्रोह करण्यात आला आहे. त्यामुळे अशा शिक्षणावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी साऱ्यांनीच अध्यक्षांकडे केली मात्र गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू असे सांगितले.
यावेळी सार्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत पहिला कारवाई करा नंतर चौकशी करा असे हिरेमठ यांना सुनावले.त्यामुळे हिरेमठ यांची भूमिका मवाळ झाली. यावेळी कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी चौकशी करून तातडीने कारवाई करा असे सांगितले. मात्र काही सदस्यांनी सभागृहात एकच गोंधळ माजविला. पहिला कारवाई करा नंतर पाहू असे सांगत ठराव संमत करण्यात आला.
उचगाव येथील एका उर्दू शाळेत 15 ऑगस्ट साजरा केला जात नाही आणि याची खबर शिक्षण खात्याला नाही. याला काय समजावे असा सवाल उपस्थित करत तालुका पंचायत सदस्य मधुरा तेरसे यांच्यासह इतर सदस्यांनी संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करून यापुढे अशा चुका होणार नाहीत अशी तंबी साऱ्या शाळेतील शिक्षकांना द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष यांनीही याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी साऱ्यांनीच याबाबत आग्रही भूमिका घेतल्यामुळे तातडीने याप्रकरणाची चौकशी करतो असे सांगण्यात आले.