खानापूर मलप्रभा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याचा संपर्क रस्ताच वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. गेल्या वर्षी या पुरवठा बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली होती. खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी साडेचार कोटी रुपयाच्या अनुदानातून सुसज्ज अशा पुलवजा बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
14 मुशी याठिकाणी 26 फूट उंचीचा पुल बांधण्यात आला आहे. या पुलावरून रुमेवाडी क्रॉस ते पारिश्वाड क्रॉस या शहरातील महत्त्वाच्या दोन चौकांना जोडणारा संपर्क रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुराचा पुलाला तडाखा बसल्याने खानापूर शहराच्या बाजूने असलेला डांबरी रस्ता वाहून गेला आहे.
केवळ पुलाचे बांधकाम शिल्लक असून रस्त्याचे बांधकाम पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना देखील उघड झाला आहे. नदी मुख्य पात्र सोडून वाहून गेलेल्या रस्त्याच्या जागेवरून नवा प्रवाहात तयार झाला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या खासगी जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे.
नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर येथील दुरुस्ती काम हाती घेता येणार आहे. तोपर्यंत नागरिकांना पुन्हा बेळगाव गोवा महामार्गावरील शहरांतर्गत रस्त्याचाच वापर करावा लागणार आहे.