हैदराबादजवळील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरील घटना
क्रॉसिंग साठी थांबविण्यात आलेल्या रेल्वेतून खाली उतरलेल्या जवानाला दुसऱ्या रेल्वेची धडक बसल्याने महांतेश शिवणगौडा पाटील (36) रा. लक्केबैल ता. खानापूर हा जवान जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हैदराबाद जवळील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. शस्त्रास्त्रांचा साठा व सैन्य दलाची अन्य सामग्री जवानांच्या बंदोबस्तात मद्रास येथून राजस्थान येथे नेण्यात येत असताना ही घटना घडली आहे.
कर्तव्य बजावत असताना जवानाच्या अपघाती निधनामुळे लक्केबैल गावावर शोककळा पसरली आहे.
महांतेश हे मद्रास रेजिमेंटमध्ये अभियांत्रिकी विभागात गेल्या सतरा वर्षांपासून कार्यरत होते.
आज सकाळी त्यांच्या टीमवर मद्रास येथून सैन्यदलाची काही सामग्री रेल्वेतून राजस्थान नेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर त्यांची रेल्वे आली. याठिकाणी दुसरी एक्सप्रेस रेल्वे क्रॉसिंग होणार होती. त्यासाठी जवान प्रवास करत असलेली रेल्वे पंधरा मिनिटांसाठी स्थानकावर थांबविण्यात आली होती.
यावेळी सुरक्षेचे कर्तव्य पार पाडत असलेले जवान गाडीखाली उतरुण पहारा देत होते. यादरम्यान रधाव वेगाने येणार्या एक्सप्रेसचा अंदाज न आल्याने महांतेश यांना रेल्वेची धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. उद्या दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव खानापूरला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई वडील व भाऊ असा परिवार आहे.