डॉल्बीमुळे दणदणाटामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेवून सांबरा गावात यापुढे डॉल्बीवर बंदी घालण्याचा निर्णय ग्राम पंचायतीने घेतला आहे. या संबंधीचा ठराव बैठकीत करण्यात आला आहे.
डॉल्बी आवाजामुळे वृद्ध, रुग्ण तसेच गर्भवती महिलांना त्रास होत आहे. लग्न आणि इतर कार्यक्रमात वेळेचे बंधन न पळता रात्री उशिरापर्यंत दणदणाट सुरू असतो. जनावरांनावरही याचे गंभीर परिणाम होत आहेत. खास करून दुभत्या जनावराचे दूध देण्याचे प्रमाणात घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
डॉल्बीवर बंदी घालण्याची मागणी गावकऱ्यांतून करण्यात आली होती. याची दखल घेत ग्राम पंचायतीने बैठकीत चर्चा करून यापुढे गावात डॉल्बीवर बंदी घालण्याचा ठराव मांडून एकमताने तो संमत करण्यात आला. यापुढे कोणत्याही कार्यक्रमाला डॉल्बीला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरावाची प्रत मारिहाळ पोलीस स्थानकाला देण्यात आली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होत आहे.
सांबरा ग्राम पंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी शहर परिसरातील सर्वच गावांनी गणेश मंडळांनी केल्यास बेळगावचा गणेश उत्सव विधायकतेकडे वाटचाल करील आणि या उत्सवाची सुरुवात करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा उद्देश आजही सफल होईल यात शंका नाही.