बेळगावमध्ये रिक्षाचे मीटर कधी डाऊन होणार या प्रश्नाला पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी उत्तर दिले आहे. येत्या 15 ऑगस्ट पासून रिक्षामध्ये मीटर प्रमाणेच भाडे घेण्याची सक्ती त्यांनी केली असून या सक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल असे पोलीस खात्याने यापूर्वीच जाहीर केले आहे.
प्रत्येक रिक्षामध्ये मीटर बसवण्यास 15 ऑगस्ट पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. 15 ऑगस्ट पासून रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक माणसाने तोंडी भाडे न विचारता मीटर लावा अशी सूचना करायची आहे. मीटर न लावल्यास संबंधित रिक्षाचा क्रमांक जवळचे पोलीस स्थानक किंव्हा 100 नंबर वर कळवणे आवश्यक असून कधीही बेळगावमधून मीटर प्रमाणे भाडे घेतले जात नाही हा इतिहास बदलायचा आहे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
काही रिक्षाचालक मनमानी भाडे घेत असल्याने प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पहाटे आणि रात्रीच्या वेळी रिक्षाचे भाडे बेळगाव मुंबई किंव्हा बेळगाव बंगळूर बस प्रवासाएव्हढे होत असल्याचा अनुभव आला आहे. या तक्रारी वाढल्याने आता मीटर सक्तीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिक्षाचालक याला कसा प्रतिसाद देतात की पुन्हा बंद चे अस्त्र उगारला जाणार हे अजून स्पष्ट नाही पण 15 ऑगस्ट पासून कारवाई सुरू करण्यास पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मीटर नसलेल्या रिक्षाचे परमिट रद्द करणे, परवाना रद्द करणे व इतर कारवाया करण्यात येणार असून जास्त वेळ पकडले गेल्यास रिक्षा सुद्धा जप्त केली जाऊ शकते अशी माहिती पोलीस खात्याकडून मिळाली आहे.