बेळगाव शहर आणि परिसरात तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाचा अपुऱ्या बसमुळे जीव धोक्यात आला आहे. तरीही ते प्रवास करत आहेत. ही आजकालची समस्या नसून रोजचीच कसरत सुरू झाली आहे. त्यामुळे परिवहन महामंडळ याकडे लक्ष देणार का? याचबरोबर ही धोकादायक वाहतूक कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगाव शहरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ये-जा करत असतात. त्याचबरोबर नागरिकही बाजारहाट साठी येतात. मात्र परत जाण्यासाठी अपुऱ्या बस सुविधा असल्याने अनेकांना बस मध्ये चढण्याची कसरत करावी लागते. काहीवेळा तर विद्यार्थ्यांचा या कसरतीत जीवही गेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून प्रशासन हात झटकत असून आणखी किती बळी जाण्याची प्रतिक्षा परिवहन महामंडळ करत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
बेळगाव शहरातील अनेक बस थांब्यावर अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बस चालक बस थांब्या पेक्षा पुढे लावतात त्यामुळे धावत-पळत कधी एकदा बस पकडतो आणि त्यामध्ये चढतो अशीच कसरत सुरू असते. ही बाब नित्याची झाली असून यामध्ये चेंगराचेंगरीची प्रकारही अधिक घडतात. त्यामुळे अधिक बस सोडून विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी आहे.
मागील दोन-तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मागील काही घटनात अनेक विद्यार्थ्यांचा बळी देखील गेला आहे या घटना वारंवार घडत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. विशेष करून वडापला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे बस मध्ये केवळ पास धारकच प्रवास करतात. यामध्ये विशेष करून विद्यार्थी अधिक असल्याने त्यांना अपुऱ्या सेवेचा फटका बसला आहे. याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी मागणी होत आहे.