बेळगावच्या विमान प्रवाश्यांना लौकरच आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. सांबरा विमानतळावरून इंडिगो पुढील महिन्याच्या 8 तारखेपासून बेळगाव- बंगळूर ही फेरी सुरू होणार आहे. विमानतळावर कंपनीचे आवश्यक साहित्य दाखल होत आहे. तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू असल्याने लौकरच या विमानतळावरून एअर इंडिगो झेप घेण्यार हे निश्चित झाले आहे.
एअर इंडिगोने सांबरा विमानतळावरून सेवा देण्याचे निश्चित केले असून कार्यालयीन कामकाजासाठी यापूर्वीच अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देत सामावून घेण्यात आले आहे.
ड्रायव्हर आणि लोडर या पदांसाठी शहरातील एका हॉटेलात मुलाखती घेण्यात आल्या.विमानतळावर मालवाहू ट्रॉली आणि लगेज चढवणारे कन्व्हे बेल्टही दाखल झाले आहेत. अश्या प्रकारचे बेल्ट केवळ एअरबस सारख्या मोठ्या विमानात साहित्य चढविण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे एअर बस सारखी मोठी विमाने दाखल होतील अशी शक्यता आहे. कौंटर सुरू करण्यासाठी कामकाज सुरू आहे.
इंडिगोला उडानमधून हैदराबाद हा एकमेव रूट मिळाला आहे. पण तत्पूर्वी बंगळूर- बेळगाव ही फेरी सुरू होणार आहे. ऑक्टोबरमध्ये बेळगाव-हैदराबाद फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आदी शहरांना थेट फेऱ्या सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सांबरा विमानतळ संचालकराजेश कुमार मौर्य यांच्या माहितीनुसार विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगोच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र याबाबत अधिकृत माहीती अद्याप मिळाली नाही. इंडिगो दाखल होत असल्याने प्रवाश्यांना आणखी पर्याय उपलब्ध होणार आहेत,असेही त्यांनी सांगितले