27 जुलै 2014 रोजी घडलेली घटना येळ्ळूरच काय तर सीमा भागातील प्रत्येक मराठी माणूस कधीच विसरू शकणार नाही.येळ्ळूर गावच्या वेशीवर असलेला महाराष्ट्र राज्य फलक कोर्टाच्या आदेशाच निमित्त करून हटवल्या नंतर पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीला आज पाच वर्षे पूर्ण होतात नेमकं त्याच दिवशी येळ्ळूर ग्राम पंचायतीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ज्या ठिकाणी गावच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य फलक होता नेमकं त्याचं ठिकाणी त्या महाराष्ट्र फलकाची आठवण म्हणून भव्य स्वागत कमान बसवण्याचा निर्णय येळ्ळूर ग्राम पंचायतीने घेतला आहे. शुक्रवारी येळ्ळूर ग्रामपंचायत मध्ये झालेल्या मासिक बैठकीत येळ्ळूरच्या प्रवेशव्दाराला स्वागत कमान बसवण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आलाय. ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांना हा ठराव मांडला तर ग्राम पंचायत सदस्य राज उघाडे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. बैठकीला अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह एकूण 30 पैकी 26 सदस्य उपस्थित होते.
येळ्ळूरची घटना पाच वर्षे जुनी असली तरी प्रत्येक मराठी मनात ती ताजी आहे असे असताना कानडी दडपशाही खाली आम्हाला काहीच करता आले नव्हते. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर बोर्ड ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य फलकाची आठवण स्वागत कमान उभी करणार असं आम्ही ठरवलंय अशी माहिती सदस्य राजू पावले यांनी दिली.
या स्वागत कमानीसाठी कर्नाटक सरकारचा फंड वापरणार नसून सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या योगदानातून हे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी अंदाजे अडीच लाख रुपये रक्कम खर्च करणार असून गणेश उत्सवा नंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे आगामी डिसेंबरच्या आत हे काम पूर्ण होईल असेही पावले म्हणाले.