बेळगावचा सीमाप्रश्न हा शिवसेनेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिवसेनेचा सामना जसा लढला आणि मार्मिकने ज्या पद्धतीने राजकारण्यांची झोप उडवली तसेच सीमाभागातील तरुण भारत ने काम केले आहे. किरण ठाकूर आणि मी आता साठी पार केली आहे. आता नव्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील. सीमभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी आणखी जास्त वेळ आपल्याला द्यावी लागणार नाही तर संयुक्त महाराष्ट्र झाल्याची नवी घोषणा आम्ही करू अशी ग्वाही सीमा वासीयांना संबोधन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 75 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.सेना भवनात या प्रश्नी विशेष बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सीमावासियांच्या प्रश्नांवर शिवसेना नेहमीच आग्रही राहिलेली आहे, त्यातच आता राज्यात आणि केंद्रात ही महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे सीमावासियांचा प्रश्न तडीस लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी एकीकरण समितीतर्फे किरण ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी सीमाप्रश्न सुटावा हे जसे आपले वडील बाबुराव ठाकूर यांचे स्वप्न होते तसेच ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते.
आज महाराष्ट्राने केंद्र सरकारसमोर हा प्रश्न मांडून तो सोडवून घ्यावा आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा ही गरज आहे. उद्धवजींनी याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक उच्चाधिकार समिती न्यावी व आवाज उठवावा अशी मागणी केली.
आपण लवकरात लवकर ठोस काही करून या प्रश्नाची सोडवणूक करून घेऊ असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.