Monday, January 13, 2025

/

तिघे वाचले तुम्हीही वाचू शकता!

 belgaum

समुद्र उधाणामुळे गणपतीपुळे येथे सलग दुसऱ्या दिवशी तीन जण बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने किनाऱ्यावर असलेल्या सजग नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यांना वाचविले. सुट्ट्यांमुळे पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिरापुढे निर्माण होणाऱ्या चाळात पोहणारे पर्यटक अडकून बुडण्याचे प्रकार घडत आहेत.

गणेश रावसाहेब संकपाळे (वय 24), मल्लिकार्जून सुरेश पाटील (वय 23), बसगवडा अर्जून नाईक (वय 20, सर्व रा. बोइगिरी, ता. अथनी, जि. बेळगाव) अशी या पर्यटकांची नावे आहेत. गणपतीपुळे येथे ते तिघेही रविवारी फिरण्यासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दुकानांच्या मागील बाजूला समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते.

पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. भरतीच्या वेळी मोठ्या लाटा किनाऱ्यावर येत आहेत. त्या लाटांमध्ये पोहण्यासाठी तिघेजण उतरले. थोड्यावेळाने लाटांबरोबर समुद्रात ओढले जाऊ लागले. वाचविण्यासाठी ते ओरडू लागले होते. किनाऱ्यावरही पर्यटक होते. एकच कल्ला सुरु झाला. तेवढ्यात शौचालय चालविणारे निखिल सुर्वे यांच्यासह परिसरातील दुकानदार, विरेश, अमये केदार यांनी वाचविण्यासाठी धाव घेतली. जवळच असलेले पोलिस सरगर व गिरी हे घटनास्थळी दाखल झाले. त्या तिघांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळे जिल्हा प्रशासनालाही सतर्क राहावे लागणार आहे. समुद्रात पोहायला जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र पर्यटकही त्याचे पालन करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतीने जीवरक्षक कमी केल्यामुळे सध्या दोनच जणं कार्यरत आहेत.

शनिवारी बुडलेल्या पर्यटकांना वाचविण्यात निखिल सुर्वे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या तिघांमधील महिला खोल पाण्यात बुडालेली होती. केसाना पकडून त्यांना पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. उरलेल्या दोघांना सुर्वे यांनी रिंगवर टाकले. जीव धोक्‍यात घालून सुर्वे यांनी त्या तीन पर्यटकांना वाचविले होते. पावसामुळे सध्या बोटींग सुरू नसल्याने पर्यटकांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. किनाऱ्यावरील फोटोग्राफर, परिसरातील दुकानदार, गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षा रक्षक यांच्यावरच भार आहे. त्यामुळे आता देवदर्शन घेऊन परत फिरा समुद्र मंथन टाळा असेच सांगण्याची वेळ आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.