स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी पालिकाने बसवलेले प्लास्टिकचे डस्टबिन अनेक ठिकाणाहून गायब झाले आहेत. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये वाया गेल्याचे दिसून येत आहे. योग्य निगराणी नसल्यामुळे ही अवस्था झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहर कचरा मुक्त करणे यासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली होती. तरीही किरकोळ स्वरूपात होणारा कचरा कुठेही टाकू नये यासाठी जागोजागी ओला व सुका कचरा गोळा होण्यासाठी शहर परिसरात अनेक डस्टबिन बसविण्यात आले होते. मात्र या डस्टबिनची योग्य निगराणी आणि नागरिकांनीही बेजबाबदारपण दाखवल्यामुळे येथील डस्टबिन वाया गेले आहेत.
सुरुवातीच्या काळात या डस्टबीन मध्ये कचरा जमा होत होता. मात्र कालांतराने हे डस्टबिन वेळोवेळी साफ न केल्यामुळे आणि कचरा डस्टबिनच्या परिसरात पडून साचू लागला होता. त्यामुळे पुन्हा जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागले. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे डस्टबिन बसविल्यामुळे ते मोडून पडले आहेत. तसेच त्यांची नाचक्की झाली आहे. त्यामुळे पालिकेचा आंधळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
क्षमतेपेक्षा अधिक वजनाचा कचरा या डस्टबिनमध्ये भरल्यामुळे काही ठिकाणचे डस्टबिन फुटून गेले तर काही ठिकाणी नागरिकांनी याला अल्प प्रतिसाद दाखविला. लाखो रुपये खर्च करून देखील निकृष्ट दर्जाचे डस्टबिन हळूहळू संपूर्ण शहरातून गायब झाले. तुटलेले मोडलेले डस्टबिन पालिका ने एका जागी गोळा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे फक्त डस्टबिन बसविण्याचा एक फार्स नागरिकांच्या कररुपी पैशाला लाखो रुपयांचा चुना लावणारा ठरला आहे.