बेळगाव जवळील कर्ले गावातील दहीकाला उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा लाभली आहे.
गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात दहीकाला उत्सव दरवर्षी आबालवृद्धांच्या उपस्थितीत करण्यात येतो.
दहीकाला उत्सवाच्यावेळी जमिनीवर एक मोठा खांब रोवण्यात येतो.नंतर त्याला आणखी एक लांब लाकूड जोडण्यात येते.या लाकडाच्या दुसऱ्या टोकाला दह्याने भरलेले मडके अडकवले जाते.नंतर आबालवृद्ध त्या लाकडी खांबाभोवती फेर धरून भजन म्हणतात.नंतर पुजारी दह्याने भरलेली हंडी फोडतो.हंडी फोडल्यावर त्यातील दह्याची चव चाखण्यासाठी बालचमुंची धावपळ उडते.दही आणि फुटलेल्या मडक्याचे तुकडे गोळा करण्यासाठी भाविकही गर्दी करतात.
गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरापासून मरगाई मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढतात.दिंडीच्या मार्गावर सुहासिनी आरती करतात.फोडलेल्या मडक्याचे तुकडे गोळा करण्यासाठी झुंबड उडते त्यामागे एक आख्यायिका आहे.दहीकाल्याच्या मडक्याचा फोडलेला तुकडा देवासमोर ठेवला तर घरात दुधदुभते कमी पडत नाही असे सांगितले जाते.