बेळगावच्या महानगरपालिकेने स्वच्छतेची ऐशी की तैशी करून सोडली आहे. शहापुरच्या अळवण गल्ली परिसरात कचरा टाकल्यास दंड बजावणार अशा अर्थाने लावण्यात आलेल्या बोर्ड समोरच महानगरपालिकेनेच कचरा टाकल्याची छायाचित्रे बेळगाव live ला मिळाली आहेत.
बेळगाव शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत मनपा किती जागृत आहे हेच यावरून दिसत असून आता दंड कुणाकडून घेणार हा प्रश्न आहे. या भागात मनपा कंत्राटदार घाण निर्माण करण्यात आघाडीवर असल्याचा आरोप होत आहे. कचरा टाकू नये असा फलक लावून त्यासमोरच कचरा टाकणाऱ्या त्या कंत्राटदारावर कुठली कारवाई होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारेच असे बेजबाबदार वागत असल्यास कारवाई कुणावर करणार हे मनपा आयुक्तांनी ठरवून दंड स्वीकारावा अशी मागणी आहे.
रिकामा जागा मिळाला की नागरिक तो बळकावून घेतात किंव्हा तेथे कचरा टाकतात ही पद्धतच आहे. असाच कचरा आनंदवाडी भागात टाकण्यात येत होता. यामुळे हा भाग गलिच्छ बनला होता पण आता त्या जागेचा उपयोग चांगला करून तेथे लहान उद्यानाचे स्वरूप देण्यात आले आहे.
या भागातील तरुण कार्यकर्ते एकत्र आले आणि मनपा आरोग्य निरीक्षक श्याम चौगुले यांनी पुढाकार घेतला. आता येथे कचरा टाकणे बंद झाले आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे. ज्या ज्या खुल्या सार्वजनिक जागांवर असा कचरा टाकण्यात येतो तेथे असे केल्यास शहर नक्की स्वच्छ होईल. हे कौतुक केल्यावर मनपाचा गलथान कारभार नागरिकांनी बेळगाव live च्या निदर्शनाला आणून दिला आहे.