डोक्यात कोयत्याने वार करून गवंड्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉललगत शनिवारी दुपारी उघडकीस आली. महादेव उसूरकर (वय ३०, रा. माँळअंगली- तालुका खानापूर बेळगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील महादेव उसूरकर याच्यासह अन्य काही युवक गवंडी कामासाठी रेठरे बुद्रुक येथील कारखाना परिसरात वास्तव्यास आले आहेत.
महादेव हा शेणोली स्टेशन येथे राहण्यास होता. परिसरात गवंडी काम करून मिळालेल्या पैशातून तो उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. त्यानंतर मात्र तो कोणालाच दिसला नाही.
दरम्यान, शनिवारी दुपारी शेरे येथील काही महिला भात लावणीसाठी शेतात निघाल्या असताना कॅनॉलजवळ त्यांना युवकाचा मृतदेह दिसला. याबाबतची माहिती त्यांनी पोलीस पाटलाला दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले.
संबंधित युवकाची ओळख पटवली असता संबंधित मृतदेह महादेव उसूरकर याचा असल्याचे समोर आले. डोक्यात कोयता घालून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी एक दुचाकी आढळून आली.
संबंधित दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे.
न्यूज सौजन्य-ऑनलाइन लोकमत