सीमा भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा पंचायतचे शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांच्या पुढाकारातून ही प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. रमेश गोरल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात यावीत असा आदेश दिला आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील चिकोडी तालुक्यातील गावांमध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतात. याच बरोबर उद्योग धंदे आणि इतर व्यवसाय थाटात असतात. मात्र त्यांना सीमाभागातील प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. याची दखल घेऊन रमेश गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.
मध्यंतरी अशी प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. यामुळे विद्यार्थी उद्योजक व इतर सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. जिल्हा पंचायत सर्वसाधारण बैठकीत कारदगा येथील सदस्य सुमित्रा उगळे यांनी याविरोधात आवाज उठविला होता. त्याची दखल घेत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी चिकोडी येथील तहसीलदारांना विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या आणि उद्योग करणाऱ्यांना आता सोयीचे ठरणार आहे. रमेश गोरल यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेकांची सोय झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.