स्वच्छ बेळगाव आणि सुंदर बेळगाव हे ब्रीद आता नामशेष होऊ लागले आहे. बेळगावला कचऱ्याच्या विळख्यात जखडून टाकले असून ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पिरनवाडी वेशीवरही अशीच अवस्था दिसून येते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिरनवाडीची वेस बुजल्याचेच दिसून येत आहे.
बेळगाव गोवा मार्गावर पिरनवाडी नजीक मोठ्या प्रमाणात कचरा फेकून देण्यात आला आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत आणि संबंधित आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या योजना राबवून स्वच्छ बेळगावचा नारा देणारे प्रशासन दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र कचरा निर्मूलनासाठी कोणतेच पाऊल उचलत नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
गोव्याकडून बेळगाव ला येताना पिरनवाडी नजीकच वेशीवर कचऱ्याचा ढीग पडला आहे. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायतीने लक्ष दिले नसून ही समस्या सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसे पाहता या जागेवर कचरा टाकण्यासाठी नागरिक ही तितकेच जबाबदार आहेत. जर नागरिकानी व्यवस्थितपणे कचऱ्याची विल्हेवाट लावली असती तर कचऱ्याचे ढीग साचले नसते. अर्धा किलोमीटर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा फेकून देण्यात आला आहे. मात्र तो स्वच्छ करण्यासाठी कोणीच पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा कचरा काढून त्या ठिकाणी कचराकुंडी उभ्या कराव्यात अशी मागणी होत आहे.