पाण्यासाठी लोक लांबच्या लांब रांगात तासनतास उभा राहून पिण्यासाठी एखादी घागर पाणी मिळवताना दिसून येतात.पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याची सर्वत्र तीव्र टंचाई जाणवत आहे.अशी स्थिती असताना एका महाभागाने बेकायदेशीररित्या नळाचे कनेक्शन घेऊन पिण्याच्या पाण्याचा वापर घराच्या बांधकामासाठी करून घर बांधल्याची घटना हिंडलगा सुळगे येथे उघडकीस आली आहे.
या महाभागाच्या प्रतापामुळे लोकांनी आता त्याला चांगला धडाच शिकवायचा ठरवले असून त्याला बेकायदेशीररित्या नळाचे कनेक्शन देणाऱ्यावर देखील कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.हा सारा प्रकार घडला आहे हिंडलगा सुळगे येथे.
गावातील पाण्याच्या टाकी शेजारीच घर बांधायला काढलेल्या एका व्यक्तीने ग्राम पंचायतीतील कोणाला तरी हाताशी धरून त्याचे हात ओले करून नळाचे कनेक्शन बेकायदा घेतले.नळाच्या पाण्याचा वापर करून या व्यक्तीने घराचे बांधकाम देखील जवळजवळ पूर्ण केले आहे.गावातील तरुणांना या नळाच्या कनेक्शनबाबत संशय आला आणि त्यांनी ग्राम पंचायत सदस्य आणि पिडीओ यांना घेऊन पाहणी केली असता नळ कनेक्शन बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले.
त्यावर गावातील तरुणांनी हे प्रकरण धसास लावण्याचे ठरवले असून या विषयावर सोमवारी ग्राम पंचायत बैठकीत चर्चा होणार आहे.ग्राम पंचायत बैठकीत या महाभागाबाबत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.