द युनिक अकॅडमी पुणे मागील 14 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रामध्ये भारतातील एक आघाडीची संस्था म्हणून कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने रविवारी आय ए एस टॉपर्स चा सत्कार बेळगावात आयोजित करण्यात आला आहे’अशी माहिती द युनिक च्या बेळगाव शाखेचे मुख्य राजकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, ‘दिल्ली ,अहमदाबाद ,इंदोर, मुंबई ,पुणे ,नागपूरसह एकूण बावीस शाखांमधून संस्थेने आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमधील करिअर संबंधात मार्गदर्शन केले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या व ग्रामीण तसेच आर्थिक-सामाजिक दृष्ट्या अविकसित घटकातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर अकॅडमी चा विशेष भर राहिला आहे. एकेकाळी केवळ दिल्ली येथे उपलब्ध होऊ शकणारे यु पी एस सी सारख्या परीक्षांचे मार्गदर्शन जे की अत्यंत खर्चिक ठरते, ते छोट्यात छोट्या शहरापर्यंत अगदी माफक शुल्कात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट अकॅडमीने ठेवले आहे. याच उद्दिष्टाचा एक भाग म्हणजे अकॅडेमीची बेळगाव येथील शाखा होय. टिळकवाडी बेळगाव येथील शाखेमध्ये मागील तीन वर्षांपासून दिल्ली, पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
ग्रामीण तथा छोट्या शहरांमध्ये आय ए एस व तत्सम स्पर्धा परिक्षांविषयी असणारा माहितीचा अभाव, अशा परीक्षांविषयी वाटणारी भीती, स्वतःच्या क्षमतांविषयी विद्यार्थ्यांना असणारी शंका या साऱ्यांचे निरसन करावयाचे काम द युनिक अकॅडमी करते आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अकॅडमी मागील तीन वर्षांपासून आय ए एस परीक्षेतील यशवंतांचा सत्कार बेळगाव शहरामध्ये घडवून आणते आहे. यशवंतांच्या मनोगतासह येथे विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाते.
यंदा या सत्कार समारंभाचे हे चौथे वर्ष असून, यंदा चे विशेष हे की आय ए एस परिक्षेत संपूर्ण भारतातून 16 वी आलेली तृप्ती धोडमिसे जी की महाराष्ट्रातून पाहिली आली आहे व संपूर्ण भारतातून 17 वा आलेला हुबळीचा राहुल संकनूर जो कर्नाटक राज्यात पहिला आला आहे या दोघांनाही एकाच वेळी प्रत्यक्ष भेटण्याची व ऐकण्याची संधी विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. सोबतच पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
रविवार दि. 16 जून रोजी सकाळी 10 वा जे एन एम सी आवारातील के एल ई सेंटनरी हॉल मध्ये सदर कार्यक्रम होणार असून तो सर्वांना खुला व मोफत आहे.यशवंतांची प्रेरक यशोगाथा अनुभवण्यासाठी व त्यांच्या कडूनच या परिक्षांसंबंधी शंकांचे निरसन करून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री राजकुमार पाटील यांनी केले