भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात छोट्या दोस्तांना लवकरच जंगलचा राजा वाघोबाचे दर्शन घडणार आहे. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणकडून परवानगी मिळाली असून भुतरामट्टीत वाघ अस्वलाबरोबरच सिंहही पाहायला मिळणार आहे.
राणी चन्नम्मा संग्रहालय ३४ हेक्टर प्रदेशात व्यापले आहे. याठिकाणी सिंह, वाघ, अस्वलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. संरक्षक भिंतीची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. सिंह म्हैसूर प्राणीसंग्रहालयातच आहे. आता उत्तर कर्नाटकातील लोकांना बेळगावातच सिंहदर्शन घडेल. राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात सिंह, वाघ, अस्वल, बिबट्या, कोल्हा, गवा असे दहा प्रकारचे प्राणी ठेवण्यास मंजुरी दिली आहे. तसेच काही पक्ष्यांच्या प्रजातीही ठेवण्यासाठी अनुमती दिली. जागेअभावी हत्ती, गेंडा असे मोठे प्राणी ठेवले जाणार नाहीत.
याठिकाणी पाणीपुरवठाही अधिक होणार आहे. सध्या प्राणी संग्रहालयाला पाणीटंचाई भेडसावत आहे. याठिकाणी दोन कूपनलिका असून एक विहीर आहे. त्याद्वारे येथील जनावरांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल. पण, प्राण्यांची संख्या वाढल्यास आणखी पाणी लागेल. त्यासाठी होनगा बहुग्राम पाणीपुरवठा योजनेचा वापर केला जाईल. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरणावेळी सुमारे १ लाख लिटर पाणी वाया जाते. या पाण्याचा वापर संग्रहालयातील तळ्यासाठी केला जाऊ शकतो. संग्रहालयाचा दर्जा वाढून प्राण्यांची संख्या वाढल्यानंतर प्राण्यांसाठी रोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासेल. त्यासाठी हे पाणी वापरले जाईल. तसेच विहीर खोदण्याचा प्रस्ताव आहे.
गीर अरण्यात अधिक तापमानात राहणारे सिंह येथील वातावरणातही राहू शकतात. पुढील दोन वर्षांत ही योजना पूर्ण होणार असून, प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने सिंह, वाघ व अस्वल संग्रहालयात ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच प्राणीसंग्रहालय असल्याने पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेलअशी माहिती
काकती वन अधिकारी एम. बी. कुसनाळ यांनी दिली.