बेळगांवमधील ज्येष्ठ व श्रेष्ठ संगीत विद्वान, विख्यात गायक, लेखक, संगीत शिक्षक, बेळगांव संगीत कलाकार संघाचे अध्यक्ष पंडित नंदन हेर्लेकर यांच्या एकसष्ठीनिमित्त ख्यात गायिका पद्मश्री शुभा मुदगल यांच्या सुश्राव्य गायनाचा आणि विख्यात तबला वादक डॉ. अनिश प्रधान यांच्या एकल तबलावादनाच्या विशेष संगीत मैफलीचे शनिवारी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिरात आयोजन करण्यात आले. शुभाजींनी आपल्या खास शैलीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांना मोहिनी घालत मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रसिद्ध हार्मोनियम वादक सुधीर नायक यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली.
पं. नंदन हेर्लेकर यांच्या असंख्य शिष्यवर्गाच्यावतीने या दोन दिवशीय विशेष संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी ज्येष्ठ रंगकर्मी, स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी शहापूर येथील विठ्ठल मंदिरच्या सभागृहात पं. हेर्लेकर यांच्या असंख्य शिष्यांचा गायन-वादनाचा सुंदर कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांच्या अप्रतिम संगीत सादरीकरणाची उपस्थित श्रोत्यांनी वाहव्वा केली. हेर्लेकर यांनी संगीतबध्द केलेल्या अनेक बंदिशी, शास्त्रीय गायन, स्वतंत्र तबला वादन, हार्मोनियम वादन, समूहगायन, गझल, भावगीते, भक्तीगीते, भजन यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित सारे भारावून गेले.
प्रारंभी गुरू पं. हेर्लेकर व सुस्मिता हेर्लेकर यांची सपत्नीक अभिमन्यू हेर्लेकर व सुखदा हेर्लेकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पाद्यपूजा केली. त्यानंतर साडेतीन तास रंगलेल्या संगीत मैफलीत शंतनू हेर्लेकर, उपग्ना पंड्या, ऋषिकेश हेर्लेकर, विनायक मोरे, स्वाती कुलकर्णी, मंजुश्री खोत, लक्ष्मीकांत बोंगाळे, प्रतिभा कुलकर्णी, सुप्रिता लोकूर, किरण मोरे यांचे सुश्राव्य गायन झाले. अभिमन्यू हेर्लेकर, सिध्दार्थ पडियार, विघ्नेश कामत यांनी दमदार तबला जुगलबंदी प्रस्तुत केली.
विनायक मोरे यांच्या विद्यार्थ्यांनी गुरु हेर्लेकर यांनी रचलेली समूहगीते उत्कृष्टपणे सादर करुन सर्वांची उत्स्फूर्त दाद मिळविली. चैत्रा, आरुषी, मानस, अर्नव, यश, भक्ती यांचे उत्कृष्ट हार्मोनियम वादन, वेदांत, विराज, आदित्य, सुमंगल यांचे सामूहिक तबला वादन झाले.
शेवटी पंडित नंदन हेर्लेकर यांच्या भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. योगेश रामदास यांनी हार्मोनियम व अभिमन्यू हेर्लेकर, संतोष पुरी यांनी तबला साथ दिली. स्वाती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शंतनू हेर्लेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर, रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.