हांदिगनूर ते मणिकेरी पर्यंतच्या रस्त्याची पुरती वाट लागली असून हा रस्ता करण्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा रस्ता करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कडोली ते हांदिगनूर व्हाया अगसग्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मागील सहा ते सात वर्षांपूर्वी हा रस्ता करण्यात आला होता. मात्र अवजड वाहने ये-जा केल्याने या रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. पावसात तर या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे निदान डागडुजी तरी करावी अशी मागणी होत आहे.
सुमारे पाच ते सहा किलोमीटर रस्ता असून या रस्त्यावरून कडोलीसह इतर नागरिक प्रवास करत असतात. विशेष करून केदनूर, बंबरगा, हंदीगनूर आधी नागरिकांचा प्रवास अधिक असतो. महाराष्ट्राला जोडण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरतो. मात्र रस्त्याची वाताहत झाल्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.