विहिरीतील गाळ काढत असताना एक व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. वरून माती कोसळल्याने गुदमरून त्याचा जीव गेला आहे,खासबाग येथे ही दुर्दैवी घटना घडली असून मयत व्यक्ती रामदुर्ग येथील असल्याचे समजते.
अविनाश पुजार असे मयत व्यक्तीचे नाव असून या घटनेत आणखी एक इसम गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे.
वालेद पुजारी असे जखमीचे नाव असल्याची माहिती मिळाली असून त्याला उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वी सर्वत्र विहिरींमधील गाळ काढले जात आहेत. अश्याच पद्धतीने हे गाळ काढण्याचे काम सुरू असताना वरून मातीचा ढिगारा कोसळून ही घटना घडली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
विहिरीतील गाळ काढताना वरून माती कोसळली जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे.
काही विहिरीच्या भिंती जुन्या होऊन आतून धक्का लागल्यावर कोसळत असतात, अशावेळी जीव धोक्यात घालून काम करण्यापेक्षा योग्य ती काळजी घ्यावी लागते. याचे भान गाळ काढणाऱ्या व्यक्तींनी घ्यावे लागेल.
सध्या शहर परिसरातील अनेक लहान मोठ्या विहिरींचे पाणी तळाला गेले असून त्या विहिरीतील गाळ चिखल काढण्याचे काम जोरात सुरू आहे.बैलहोंगल रामदुर्ग रायबाग भागातील कामगार हे काम करत आहेत.खासबाग मध्ये देखील रामदुर्गचे कामगार गाळ काढत असताना ही घटना घडली आहे.