मान्सूनला सात जून पासून सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही पावसाचा पत्ता नाही. यामुळे शेती कामे तसेच इतर पाण्याची समस्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाची उघडीप असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. पंधरा दिवस झाले तरी मान्सून सुरू झालाच नाही, त्यात भर म्हणून कडकडीत ऊन पडत आहे.
मान्सूनपूर्व पाऊस जोराचा होईल अशी अपेक्षा साऱ्यांना होती. मात्र केवळ दोनच दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून उघडीप दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ झाली. सध्या शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा पत्ता नाही. यामुळे शेतकऱ्यांतून पेरणीची कामे व इतर कामे खोळंबली आहेत. पाऊस पडला नसल्याने शेत-शिवार भकास अवस्थेत आहे.
वळीव जोरदार पडेल अशी आशा शेतकर्यांना होती. काही प्रमाणात हजेरी लावलेल्या वळवाने पाठ फिरवली. त्यानंतर सात जून रोजी मान्सून बरसेल व पाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीची कामे होतील असा अंदाज होता. मात्र ही सारी कामे खोळंबली असून साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांची तगमग वाढली आहे.
पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधून मधून आकाशात ढग दाटून येत असल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या पाऊस पडेल अशी आशा आहे. हवामान खात्याचा अंदाज दरवर्षीच चुकतो आता 20 जून झाला तरी अजूनही पावसाने तग धरली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.