तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील हजारो गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. किंवा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे आता साऱ्यांची भिस्त पावसावर अवलंबून आहे.
चारा आणि पाण्यावाचून जनावरांची उपासमार होत असल्याने शेतकऱ्यांनी पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्यांचा आसरा घेतला आहे. सध्या काही प्रमाणात पावसाचे आगमन झाले असले तरी म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे पाणी टंचाई अजूनही तीव्र आहे.
बेळगाव जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र योग्य प्रमाणात पाण्याचे नियोजन नसल्यामुळे अनेकांना वणवण करावी लागत आहे. पावसाचा अजुन पत्ता नाही. त्यामुळे पेरणीसह इतर कामे खोळंबली आहेत.
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने देखील तळ गाठला असून मोजक्या काही दिवसात हे पाणी संपणार आहे त्यामुळे शहरात देखील भीषण पाणी टंचाई आता पासूनच सुरू झाली आहे. या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी केवळ पाऊस हाच पर्याय असून पालिका काय करणार याकडे लक्ष लागले आहे.
आणखी काही चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस तीव्र होत जाणाऱ्या पाणी समस्यामुळे अनेकांना हैराण करून सोडले आहे. जिल्ह्यात लाखो जनावरे चारा आणि पाण्याविना आहेत. अशा परिस्थितीत सरकारने पाणी आणि चारा पुरवावा अशी मागणी होत आहे.जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास पाणी आणि चारा समस्या मिटणार आहेत त्यामुळे शेतातील कामे ही जोमाने सुरू होणार आहेत यंदा पेरणी उशिरा करण्यात आली आहे पाऊस येणार की नाही या संभ्रमात अजूनही शेतकरी आणि नागरिक आहेत.