दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात डोकेदुखी ठरलेल्या पिण्याच्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर चर्चा करणार असल्याचे कर्नाटकाचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी महाराष्ट्राच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्याला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दोन राज्यातील नाकरिकांना पाणी आणि शेतकर्यांचे हित जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारबरोबर बोलणी करून कायमस्वरुपी उपाय योजण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पाण्याचा वापर करण्याकरिता करार करण्यास कर्नाटक सरकारची सहमती असली तरी याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच समझोता केला जाईल. पैशाच्या बदल्यात 4 टीएमसी पाणी वापराचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारचा आहे. यासंदर्भात अधिकारी माहिती जाणून घेत असल्याची माहिती डी. के. शिवकुमार यांनी दिले.
करार करण्यास वेळ हवा
पाणी वापराचा करार करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र कर्नाटकाला लिहिले आहे. याबाबत निर्णय घेण्याकरिता कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमास्वामी यांनी वेळ देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. सरकार हा करार करण्यापूर्वी उभय राज्यांचे पाटबंधारेमंत्री या संदर्भात विस्तृतपणे चर्चा करतील. यानंतरच करार करू या अशा आशयाचे पत्र कुमारस्वामी यांनी महाराष्ट्र सरकारला लिहिले असल्याचे शिवकुमार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजापूर बंधार्यातून पाणी सोडण्याबाबत कर्नाटकाच्या पाटबंधारेमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यानंतरच दोन्ही सरकारांनी बैठक घेऊन चर्चा केल्यानंतरच दोन्ही राज्यांतील शेतकर्यांचे हित साधता येणे शक्य असल्याचे शिरोळचे आ. उल्हास पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आ. श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी, लक्ष्मी हेब्बाळकर, महांतेश कौजलगी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी या सर्वांनी बेळगाव जिल्ह्याच्या व्याप्तीतील कल्लोळ बंधार्याला आणि मांजरी नदी पूलवजा बांधार्याची पाहणी केली. यानंतर मंत्री शिवकुमार यांनी पंपसेट बसविण्यासंदर्भात आ. गणेश हुक्केरी, महांतेश कवटगीमठ यांच्याकडून माहिती घेतली.
नदीकाठावर बसविलेल्या मोटारी तसेच चिकोडीला अधिकाधिक पाणी कसे पुरविता येईल, यासंदर्भात पाटबंधारे अधिकार्यांकडून मंत्र्यांनी माहिती घेतली. कृष्णेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास त्याचा काय लाभ होणार, असा प्रश्न शिवकुमार यांनी केला. मांजरी गावात बावन-सवदत्ती आणि मांजरी गावामध्ये बंधण्यात येत असलेल्या पूलवजा बंधार्याच्या कामाची पाहणी केली.
पावसाळ्यात मांजरी नदीचा जुना पूल पाण्यागाली जात असल्याने स्थानिकांच्या मागणीनुसार नवे काम हाती घेण्यात आले आहे. या भागातील जनतेला सोयीचे होणार असल्याची माहिती विधानसभेचे मुख्य प्रतोद गणेश हुक्केरी यांनी दिली.खा. डॉ. प्रभाकर कोरे, आ. दुर्योधन ऐहोळे, महांतेश कवटगीमठ, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी आदीही यावेळी उपस्थित होते. शिवकुमार यांनी उगार बंधार्याला भेट देताच पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निवारण करावे, असे निवेदन तेथील नागरीकांनी सादर केले.