दक्षिण अमेरिकेतून आलेले रानमोडी इप्याटीरीयल तणरुपी झुडूप पिकांबरोबरच वैरणलाही मारक ठरत आहे. बेळगाव पासून पश्चिम घाटातील जंगल आणि कृषी उत्पादन क्षेत्र रानमोडी तणाने व्यापले आहे, हे तण फोफावल्यास जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सन 1975 पासून राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिकांमध्ये गाजर गवताचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. राज्यात हे गवत चटकचांदणी, काँग्रेस, पांढरी फुले नावानेही ओळखले जाते. शेती नुकसानीबरोबरच शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही गाजर गवताने धोका पोहोचवला असल्याने या तणांच्या नाशाचे काम हाती घ्यायला हवे पण सध्या कृषी विभागाच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात येत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे शेतजमीन मशागत करताना शेतकऱ्यांना याचा चांगलाच त्रास होत आहे.
सहकारी संस्था, सामाजिक संस्था, शेतकरी गट यांच्या सक्रिय सहभागाने कृषी खात्याने हे गवत उपटून काढून जाळून निर्मूलन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पिकांमधील गाजर गवात निर्माण होण्यासाठी विविध साहित्यांचा पुरवठा करण्यावर कृषी खात्याने भर दिला पाहिजे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
रानमोडी हे रुंद पानाचे आहे. त्याची पाने खाऊच्या पानासारखी दिसतात. रानमोडी याचा प्रादुर्भाव गवताच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे गवताचे क्षेत्र कमी आणि रानमोडीचे क्षेत्र अधिक अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाजर गवत एक ते तीन फुटांपर्यंत वाढते तर रानमोडी पाच ते दहा फुटांपर्यंत वाढते.
तसेच तिची पाच फूट रुंदीची जाळी तयार होते. त्याचबरोबर रानमोडीच्या बियांची संख्या अधिक असल्याने या बिया वाऱ्यामार्फत दोनशे ते पाचशे फूट लांब जाऊन त्याठिकाणी गवतात उगतात. गवताबरोबरच रब्बी पिकात रानमोडी तणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यावर कृषी खात्याने विचार करून रानमोडी गवत निर्मूलनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.