गणेशोत्सव जवळ आला आहे. मूर्तिकारांची कामे प्रशासकीय निर्णयाच्या प्रतीक्षेत अडली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू च्याच मूर्ती करा असा नियम लावला जात असताना मनपाने पीओपीची मूर्ती जप्त करू असा इशारा दिला आहे. यामुळे मूर्तिकारात संभ्रम कायम असून गणेशमूर्तीच्या निर्णयाचा तिढा अजून सुटलेला नाही.
सण जस जसा जवळ येत आहे तशी हुरहूर वाढत आहे. बेळगाव शहरातील मूर्तींचे विसर्जन कुठल्याही नदीत होत नाही. सर्वत्र तलावात विसर्जन होत असल्याने मूर्ती पीओपीची असली तरी पर्यावरण दूषित होण्याचा प्रश्न येत नाही. पण प्रशासन मूळ निर्णयावर असून बसल्याने ऑर्डर घ्याव्या की न घ्याव्या या प्रश्नात मूर्तिकार आणि सार्वजनिक उत्सव मंडळे अडकून बसली आहेत.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यात काहीतरी तोडगा काढू असे सांगून दिलासा दिला असला तरी प्रशासन आणि पालकमंत्री यांच्यातील परस्पर विरोधी विधानांमुळे समस्या अधिकच वाढत आहेत.
लवकरात लवकर यावर तोडगा निघाल्यास गणेश मूर्ती बनवण्याचे काम मूर्तिकारांना सुरू करता येणार आहे. प्रशासन व पालकमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन मूर्ती बद्दल योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आहे.