देव्हाऱ्यातील दिव्याची पेटती वात उंदराने घरातील कपड्यावर आणून टाकल्याने घराने पेट घेतला. यामध्ये आठ वर्षाच्या बालिकेचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री दिडच्या सुमारास रघुनाथ पेठ अनगोळ येथे ही घटना घडली. कस्तुरी रामू मलतवाडी (८, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) असे मृत मुलीचे नाव आहे.
याबाबत अग्निशामक दलाने दिलेली माहिती अशी, मलतवाडी कुटुंबीय जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले होते. मेंढपाळ असणारे वडील बकरी घेऊन बाहेर गेलेले असल्याने घरात आई व तीन मुले होती. रात्री दीडच्या सुमारास दिव्यातील पेटती वात उंदराने तोंडात धरून घरात ठेवलेल्या कपड्यावर आणून टाकली. आधी कपड्यांनी पेट घेतला, त्यानंतर इतर वस्तू पेटल्या. यावेळी जागे झालेल्या आईने बाजूला झोपलेला एक मुलगा व दुसर्या मुलीला हाताला धरून घराबाहेर आणले. परंतु भांबावलेल्या स्थितीत घरात आणखी एक मुलगी कस्तुरी तेथेच झोपली आहे याचे भान माऊलीला राहिले नाही.
दहा मिनिटानंतर तिला कस्तुरीची आठवण झाली, तिने अग्निशामक दलाच्या जवानांना आपली आणखी एक मुलगी आतच राहिल्याचे सांगितले. यावेळी जवानांनी धावपळ करत आत प्रवेश केला. परंतु, संपूर्ण घराला वेढलेल्या आगीमुळे कस्तुरीचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता.
अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. पेटलेल्या घरात बालिकेचा होरपळून मृत्य झाल्याने अनगोळसह बेळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. यामध्ये घराचेही जळून मोठे नुकसान झाले आहे. टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.