एक वेळा समितीच्या नावाखाली सत्ता आणि खुर्ची मिळविलेल्या मंडळींनी आता मोह सोडावा आणि अशी माणसे जर पुन्हा खुर्ची मागण्यासाठी येत असल्यास नागरिकांनी त्यांना जवळ करू नये ही गरज ओळखून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कामाला लागली आहे. खानापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात याबद्दल जागृती सुरू आहे.
माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांच्या माध्यमातून जनजागृती दौरे सुरू आहेत. समितीच्या निवडणुका या जनतेची इच्छा दाखवण्यासाठी असतात याबद्दल ही जागृती सुरू असून अनेक नागरी प्रश्नावरही समितीने आंदोलन सुरू केले आहे.
खानापूर शहरातील सांडपाणी मलप्रभा नदीत सोडल्यामुळे कुप्पटगिरी, करंबळ, रुमेवाडी तसेच आसपासच्या गावाच्या लोकांना तसेच जनावरांना पाणी देण्यासाठी उपद्रव होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे यासाठी प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक झाली आणि नेते विखुरले तरीही जनता एकजुटीने समितीच्या पाठीशी आहे. लोकलढा कायम ठेवण्यासाठी समितीने जनतेत मिसळून काम करणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.