सीमा भागातील मराठी पाठयपुस्तकातील चुका सुधार करून स्वच्छ शुद्ध भाषा लेखनातील पुस्तके पुरवा अशी मागणी युवा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे.
युवा समितीच्या पदधिकाऱ्यानी आज गुरुवारी बेळगावच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याची भेट घेऊन,
मराठी पाठय पुस्तकामध्ये झालेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या.
बेळगावचे जिल्हाशिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी निवेदनाचा स्वीकार करीत, संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली जाईल आणि येत्या ८ दिवसात कमी प्रमाणात चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील अथवा जास्ती चुका आढळल्या तर पुस्तके बदलून ती विद्यार्थ्यांना पुरवली जातील असे आश्वासन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती* च्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
या अगोदर जिल्हा पंचायत बैठकीत आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी या मुद्यावरून शिक्षण अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती त्या नंतर युवा समितीने वरील मागणी केली आहे.
घाणेरड्या छपाई मुळे शासनाचा शिक्षणात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केला असून पाठयपुस्तक महामंडळ आणि प्रकाशका वर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
या प्रसंगी युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे,दक्षिण विभाग संघटक सचिन केळवेकर, विनायक कावळे, सरचिटणीस श्रीकांत कदम, उत्तर विभाग संघटक रोहन लंगरकांडे आदी उपस्थित होते.