बेळगाव शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज कुठे ना कुठे पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जाते. पाणी वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न होत नाहीतच शिवाय झालेल्या गळत्या लवकर बंद करण्याकडे लक्ष दिले जात नाही. जर गळत्या वेळेत निवारल्या गेल्या तर शहर तहानलेले राहणार नाही पण याकडे दुर्लक्ष होत आहे.
आज पाऊस येईपर्यंत पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लोक पाणी मिळवण्यासाठी धावपळ करीत आहेत. पाणी नळाला वेळेत येत नाही आणि आलेले पाणी पुरत नाही अशीच स्थिती आहे.
या वातावरणात निर्माण होत असलेल्या गळत्याचे प्रमाण अधिक आहे. या गळत्या बंद करून पाणी वाया जाऊ नये यासाठी पाणी पुरवठा मंडळ का प्रयत्न करीत नाही हा प्रश्न बेळगावचे नागरिक विचारत आहेत.
मागे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन राकसकोप जलाशय ते बेळगाव पर्यंत ज्या मार्गाने पाईपलाईन घालण्यात आलेली आहे त्या भागातून पायी वाटचाल करून गळत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले होते पण आता तसे प्रयत्न होत नाहीत आणि शहराच्या वेगवेगळ्या भागातील गळत्या रोज हजारो लिटर पाणी वाया घालत आहेत.
राकसकोप जलाशयातील पाणी साठा संपत चालला आहे. यापुढे उपलब्ध पाणी वाया जाऊ नये यासाठी काळजी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.