खानापूर तालुक्यातील राजवाळ गवळीवाडा ग्रामस्थांचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन*
गेल्या वर्षभरापासून मराठी शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान सहन करणाऱ्या राजवळ गवळीवाडा ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा आज आज कडेलोट झाला. 87 विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून चक्क कार्यालयातच शाळा भरविली.
या या अनोख्या गांधीगिरी स्टाईलने केलेल्या आंदोलनाची धास्ती घेऊन शिक्षण खात्याने अखेरीस उशिरा का असेना गवळीवाडा शाळेमध्ये आवश्यक असलेल्या दोन शिक्षकांच्या नियुक्तीचा लेखी आदेश बजाविला. गवळीवाडा येथे पहिली ते सहावीपर्यंत प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेत गवळी समाजाचे 87 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी एक मराठी व एक कन्नड असे दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यातही मराठी विषय शिक्षकांना शिक्षण खात्याची कामे, बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम व इतर सरकारी कार्यक्रमाने हजेरी लावावी लागत असल्याने संपूर्ण सहा वर्गांच्या अध्यापनाची जबाबदारी एका कन्नड शिक्षिकेवर पडत आहे.
त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गवळीवाडा शाळेत आणखी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली होती. मात्र शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन महिना लोटला तरीहीही शिक्षकांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि खानापूर तालुक्यातील शिक्षण प्रेमींच्या नेतृत्वाखाली येथील शिवस्मारका पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखून गटशिक्षणाधिकारी यांच्या कक्षा समोरच विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व प्रार्थना म्हणून त्याच ठिकाणी अभ्यासास सुरुवात केली. या आंदोलनामुळे कार्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी व शिक्षकांची एकच तारांबळ उडाली. दुपारचा मध्यान्न आहारही गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोरच तयार करण्यात आला. दुपारी विद्यार्थ्यांना कार्यालयातच जेवणाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, रमेश धबाले यांच्यासह माजी ता प सदस्य मल्लाप्पा मारीहाळ, मर्याप्पा पाटील, विठ्ठल गुरव, नारायण काटगाळकर, अनंत पाटील विवेक गिरी आदींनी गटशिक्षणाधिकारी उमा बरगेर यांना तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या गैरसुविधांबद्दल धारेवर धरले. मराठी शाळांना शिक्षकांची कमतरता भासत असताना ही समस्या दूर करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला. राजवाळ गवळीवाडा शाळेला दोन शिक्षक देत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचे इशारा देण्यात आला. या आंदोलनाची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी बरगेर यांनी एन एस पाटील आणि एस पी कडोले या दोन शिक्षकांचे गवळीवाडा शाळेत नियुक्तीचे आदेश बजाविले. संबंधित दोन्ही शिक्षकांना कार्यालयात बोलावून घेऊन पालकांसमक्ष त्यांना लेखी आदेश देऊन गवळीवाडा शाळेमध्ये हजर होण्याचे आदेश बजाविले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी अनेक लक्षवेधी घोषणांचे फलक धारण करून शिक्षण खात्याबद्दलची चीड व्यक्त केली.