Wednesday, January 22, 2025

/

एक झपाटलेला संगीत शिक्षक: विनायक मोरे

 belgaum

आज जागतिक योग दिना बरोबरच जागतिक संगीत दिवस ही आहे. यानिमित्ताने बेळगाव मधील एक झपाटलेल्या संगीत शिक्षकांची ओळख आपण करून घेणार आहोत.
सध्या संगीताची क्रेझ वाढलेली आहे. टीव्ही आणि ऑनलाइन म्युझिक व्हिडिओ च्या मुळे मागील दशकात संगीत घराघरात पोहोचले .अशी माहिती स्वरांजली म्युझिक अकॅडमी चे संगीत शिक्षक विनायक मोरे यांनी दिली. सामुदायिक संगीताचे मास्टर म्हणून ओळखले जाणारे विनायक मोरे यांनी अनेक विक्रम केले आहेत.

 

Vinayak moreसंगीत शिक्षक श्री विनायक मोरे हे विविध शिक्षण संस्थांमधून वयाच्या सतराव्या वर्षापासून गेली 22 वर्षे संगीत अध्यापन करतात. ज्येष्ठ संगीत विद्वान पंडित नंदन हेर्लेकर यांचे ते पट्टशिष्य असून स्वरांजली संगीत संस्थेचे प्रमुख आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले असून बेळगावसह दिल्ली, मुंबई, पुणे, भुवनेश्वर, उज्जैन, गोवा, देवगड, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर, मिरज, बेंगलोर, हुबळी, धारवाड आदी ठिकाणच्या अनेक नामवंत स्पर्धांमधून त्यांनी असंख्य पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या विद्यार्थिंनीही राज्य तसेच राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
सुरमयी भारत- “समूह गायनाचे मास्टर” म्हणून खास परिचित असलेले विनायक मोरे यांनी 26 जानेवारी 2006 प्रजासत्ताक दिनी युनियन जिमखान्याच्या भव्य मैदानावर शहरातील निवडक 28 शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांना विविध भाषांमधील 20 देशभक्ती गीते शिकविली व त्यांच्या समूह गायनाचा “सूरमयी भारत” हा जाहीर कार्यक्रम प्रस्तुत करून सर्वांना चकित केले. हजारो विद्यार्थ्यांकडून एक सूर-तालात देशभक्ती गीते सादर होणे हा एक रोमांचकारी अनुभव होता.
जागतिक विश्वविक्रम- 26 जानेवारी 2016 रोजी मराठा मंडळ संस्था समूहाच्या 15,800 विद्यार्थ्यांना दीड महिन्याच्या कालावधीत पाच विविध देशभक्तीगीते शिकविली आणि जागतिक विश्‍वविक्रम नोंदविला.
विशेष कार्यक्रम- 8 फेब्रुवारी 2015 रोजी बेळगावात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा मंडळच्या एक हजार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम गीतास सर्वांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
विश्व कन्नड संमेलन- 11 मार्च 2011 रोजी बेळगावमध्ये मोठा गाजावाजा झालेल्या जागतिक विश्व कन्नड संमेलनात विविध शाळा-कॉलेजच्या 550 विद्यार्थ्यांनी विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकाचे राज्यगीत “जय भारत जनानिय तनुजाते” हे नाडगीत सादर करून सर्वांना आकर्षित केले. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सादर झालेल्या या नाडगीताने संमेलनाची शान वाढविली.
मोफत संगीत वर्ग- विनायक मोरे यांनी संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश मंदिरात सर्वांसाठी दर रविवारी मोफत संगीत वर्ग प्रारंभ केले असून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
विशेष सामाजिक उपक्रम- 7 जुलै 2012 मध्ये हे अनाथ मुले, वृद्ध नागरिक, अंध, मतिमंद, शारीरिक अंग विकलांग, एचआयव्हीग्रस्त तसेच कॅन्सर पीडितांना 30 दिवसांच्या कालावधीत ते राहत असलेल्या ठिकाणी जाऊन विविध गीते शिकवली व त्या सर्वांना एका रंगमंचावर आणून त्यांचा कुमार गंधर्व रंगमंदिर सभागृहात जाहीर कार्यक्रम सादर केला व सामाजिक बांधिलकी जपली. हिंडलगा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांनाही त्यांचे मानसिक संतुलन आणि मन परिवर्तन होण्याकरिता श्री मोरे यांनी संगीताचे धडे दिले.
संगीत कार्यशाळा- गेल्या सात वर्षांपासून स्वरांजलीतर्फे शहरातील सर्व बीएड् महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांना वंदे मातरम, राष्ट्रगीत, संस्कारक्षम प्रार्थना तसेच देशभक्ती गीते शिकवून तसेच “शाळेत संगीत विषय कसा शिकवावा” याबाबत दरवर्षी संगीत कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मानसन्मान- श्री विनायक मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संघ-संस्थांनी त्यांना गौरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने गोवा येथील शिक्षक विकास परिषद, ज्ञानदीप प्रतिष्ठान तसेच गोवा कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत सेवेबद्दल “राष्ट्रीय कला भूषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच बेंगलोर येथील रविंद्र कलाक्षेत्र येथे “कर्नाटक कला भूषण” पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. भारत विकास परिषदेतर्फे “आदर्श शिक्षक” पुरस्कार, राज्य मानव हक्क मंडळातर्फे “सदभावना प्रशस्ती”, सिरिगन्नड राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे “सिरीगन्नड प्रशस्ती”, बाल साहित्य संमेलनात “संगीत सेवा” पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
श्री विनायक मोरे यांनी अनेक असाध्य वाटणाऱ्या गोष्टी लिलया करून दाखविल्या. त्यांना समाजकार्याचीही आवड असून अनेक मंडळे संघ-संस्थांच्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी उत्स्फूर्त सहभाग असतो. यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान, पथनाट्य, विविध सामाजिक समस्यांवर जनजागृतीपर प्रभात फेरी, गडकोट मोहीमा यांचा अंतर्भाव आहे. भविष्यातही आणखी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यास खूप शुभेच्छा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.