सांबरा विमानतळावरील विमानांची संख्या वाढत आहे. येत्या 20 जून पासून पाच ठिकाणांसाठी आठ विमाने सांबरा विमानतळावरून झेप घेणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बेळगाव शहर ते विमानतळ अशी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी आहे. बेंगलोर साठी चार हैदराबाद अहमदाबाद मुंबई आणि पुणे या साठी चार याप्रमाणे एकूण पाच ठिकाणांसाठी आठ विमाने विमानतळावरून सुरू झाली आहेत.
या विमानतळाला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर नागरिकांना करावा लागत आहे. इतर विमानतळ प्रमाणेच शटल बस सेवा सुरू झाल्यास सांबऱ्यापासून बेळगाव पर्यंत प्रवास सोपा आणि कमी खर्चात होऊ शकतो, याची नोंद विमान उड्डाण प्राधिकरण आणि परिवहन महामंडळाने घेऊन लवकरात लवकर बससेवा सुरू करायची गरज आहे.
2017 मध्ये परिवहन महामंडळाने या प्रकारची बस सेवा सुरू केली होती. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र विमानसेवा बंद झाल्यापासून ही बससेवा बंद झाली त्यामुळे खाजगी प्रवासी वाहनांचा वापर विमानातून प्रवास करणार्या नागरिकांना करावा लागतो.
बहुतांश नागरिक खासगी सेवेचा वापर करत असले तरी सर्वसामान्य वर्गातील लोकांना विमानाने प्रवास करण्यासाठी जाताना किंवा येताना बसची व्यवस्था झाल्यास त्याचा वापर लोक करू शकणार आहेत, याची नोंद घेण्याची मागणी आहे. यासंदर्भात यापूर्वी बेळगाव सिटीजन कौन्सिल व चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनांनी निवेदने दिली आहेत, पण याची दखल घेण्यात आलेली नाही, आता 20 जून पासून विमानांची संख्या वाढत जाणार असून याकडे लक्ष देऊन उडान योजनेसाठी बससेवेचे सहकार्य होण्याची मागणी आहे.