कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने घाई गडबडीने अंमलबजावणी केली असली तरी निर्माण झालेला संघर्ष आणि तिढा अजून सुटलेला नाही. पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला पण यश आलेले नसून हा तिढा सुटणार कधी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजी मार्केट धाक दाखवून स्थलांतरित केल्यानंतर सर्व प्रश्न सुटलेले नाहीत, उलट नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत, एपीएमसी मधील मार्केट मध्ये जुन्या व्यापाऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे, तेथे असलेले 110 गाळे वाटून घेणे अवघड झाले आहे, जुन्या व्यापाऱ्यांना एपीएमसी मधील नवे व्यापारी सहकार्य करायला तयार नाहीत असा संघर्ष वाढत असल्याने जुन्या व्यापाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे सतीश जारकीहोळी यांच्यासमोर मांडले आहे.
सतीश यांनी आज एपीएमसी मार्केट ला भेट देऊन समन्वय साधून व्यवसाय करा अशी सूचना केली पण नवीन व्यापारी आम्ही दुकाने मिळवली आहेत तेंव्हा दुसऱ्यांना आम्ही सामावून घेणार नाही असे म्हणत आहेत तर जुने व्यापारी एक तर आपल्याला जागा द्या किंव्हा आमच्या मूळ ठिकाणी व्यापार करण्याची संधी द्या अशी मागणी करीत आहेत, यावेळी जारकीहोळी यांनी सर्व सदस्यांची बैठक घेऊन सहा महिन्यात नवीन गाळे बांधून द्या आणि तोपर्यंत सगळ्यांना विभागून व्यवसाय करण्याची संधी द्या अशी सूचना केली आहे.
नव्या जुन्या व्यापाऱ्यातील संघर्ष कमी झाला तरच सर्व प्रक्रिया चांगल्या होणार असून त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होण्याची गरज आहे.