‘काळी आई जाईल म्हणून जीवाला लागला घोर’ अशी अवस्था रयत गल्लीतील युवा शेतकरी तानाजी हलगेकर याची झाली आहे, त्याने मानसिक धक्का लावून घेतला असून तो अस्वस्थ झाल्याने आता त्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली आहे.
शासनाने व महामार्ग प्राधिकारण खात्याने कोणतीही नोटीस अथवा रस्त्यात शेती जाणार आहे अशी सूचना त्याला दिली नव्हती. त्याच्या सात बारा उताऱ्यावर तसेच ज्यांची शेती जाणार आहे त्या त्या उताऱ्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण खाते म्हणून उल्लेख केला आहे. पण या युवा शेतकऱ्याच्या उताऱ्यावर कोणताही उल्लेख नसताना सर्वेक्षण करणारे एकदा ३३ गूंठे, एकदा १५ गूंठे तर एकदा ५ गूंठे जाणार अशी वेगवेगळी उत्तरे देत आहेत. त्यामूळे नक्की किती शेती जाणार आहे याची खात्रीच न पटल्याने मानसिक धक्का बसल्याने तो अत्यवस्थ झाला.
त्याला खासगी रुग्णालयात कालपासून दाखल करण्यात आले आहे.त्याची चौकशी करण्यासाठी रयत गल्ली शेतकरी कमिटी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तब्येतीची विचारपूस करुन मानसिक आधार दिला.