बेळगाव शहर स्मार्टसिटीत समावेश झाले असून दुसरीकडे याच सिटीतील मैदानांचा मात्र पुरता खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती आणि इतर उपनगरात क्रीडा संकुलाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. येथील भौतिक सोयीसुविधा अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर असून जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
स्पर्धेसाठी आलेले खेळाडू मैदानाबाहेर आणि जुगारी तळीराम मैदानात अशी परिस्थिती अनुभवायला मिळते. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर काही पोलिस स्थानके आहेत मात्र अशा दंगा घालणाऱ्या तळीरामांना किंवा जुगारीना अटक होण्याची तसदीही पोलीस घेत नाहीत.
शहरात आणि उपनगरात अनेक मैदाने आहेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रीडास्पर्धा सातत्याने होत असतात. परंतु या स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडूंना येथे येणे एक प्रकारचे शिक्षा असल्यासारखेच वाटू लागले आहे. कारण काही ठिकाणी भौतिक सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे तर काही ठिकाणी तळीरामांच्या त्रासाला खेळाडू बळी पडत आहेत. मैदानावर कुठल्याही स्वरूपाचा क्रीडा प्रकाराच्या सरावाची चांगली सोय नाही. सिमेंटच्या ट्रॅकची खड्ड्यांनी चाळण बनली आहे.
(Photo सौजन्य toi-हा फाईल फोटो आहे मैदानाची दुरावस्था)
बास्केटबॉल, फुटबॉल, खो खो, कब्बडीसाठी आणखी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारांत अनेक संकुलन आणि मैदानी अडकले आहेत. त्यामुळे प्रशासन अक्षरशः या समस्याकडे साफ दुर्लक्ष करून तळीराम आणि जुगार यांना सहकार्य करत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
काही नागरिक तर मैदानात उघड्यावर शौचास बसण्यासाठी त्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या जनावरांना चरण्यासाठी काही मैदानांचा उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्पर्धा ठेवायचा तरी कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे मैदानांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता गांभीर्याने विचार करणे ही काळाची गरज बनली आहे.