बायपास वरून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला हादरवले आहे अलारवाड ते मच्छे बायपासच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी हातात माती व फास घेण्याचा दोर घेऊन प्रशासनाला चांगलेच हादरवले आहे.
सुरेखा बाळे कुन्द्री या शेतकरी महिलेने गळ्यात फास अडकवत आमच्या तोंडात माती जात असून आता मरण्याशिवाय पर्याय नाही मी गळफास घेऊन मरणार आहे आमच्या सुपीक जमिनी ला हात लावाल तर याद राखा असा इशारा दिला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय बोलावे हे समजत नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा विरोध असतानाही बायपास करण्याचे नाटक प्रशासन करत आहे. शुक्रवारी हातात शेतातील माती भरलेली बुट्टी घेऊन शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
यावेळी जमीन घेण्यात आली तर आम्ही रस्त्यावर येऊ यामुळे आम्हाला जगण्याचा आधार नाही तेंव्हा मेलेले बरे अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून उपस्थित माध्यम प्रतिनिधी सुद्धा हेलावून गेले होते. अखेर शेतकऱ्यांचा आवाज ऐकून योग्य निर्णय घेऊ असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवण्यात आले आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन देणार नाही असा इशारा देऊन शेतकरी परतले आहेत.
पोलिसांकडून दमदाटी करून दहशत निर्माण करून बळजबरीने वर्षातून तीन पिके देणारी जमीन संपादित करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.शेतकऱ्यांवर सुरु असलेला अन्याय पाहिला तर हे दहशतवादी कृत्य आहे असेच वाटते असा आरोप प्रकाश नाईक यांनी केला..एका ठिकाणी शंभर फूट दुसऱ्या ठिकाणी दोनशे आणि चारशे फूट रास्ता करण्यात येणार आहे.राजकारणी आणि अधिकारी लोकांच्या जमिनी वाचविण्यासाठी काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी करण्यात आल्याचा आरोपही शेतकरी नेत्यांनी केला असून भू संपदानाला प्राणपणाने विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.यावेळी रेणुका बाळेकुन्द्री,पांडुरंग बाळेकुंद्रो, सतीश शिवनगेकर,बाळाराम पोटे,अमृत भाकोजी, देविदास चव्हाण पाटील,मारुती होसुरकर,हणमंत बाळेकुंदरी आदी उपस्थित होते.