सध्या माझ्या जीवाला धोका आहे, माझे पती व सासरे यांच्यानंतर आता मला संपविण्याचा डाव सुरू आहे. मला मारण्यासाठी गुंड पाठवण्यात आले, मला घरात जाता येऊ नये याची व्यवस्था आहे, आता तर माझ्या बहिणीवर चाकू हल्ला झाला आहे, मला पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी दिवंगत संभाजीराव पाटील यांची सून साधना सागर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
साधना यांनी बेनकनहळ्ळी येथील संभाजी पाटील यांच्या निवासस्थानावर पत्रकार परिषद घेतली. पहिल्यांदा माझ्या पतीला संपवण्यात आले आहे, त्यानंतर मला प्रॉपर्टी देतो असे सांगून पोलीस तक्रार करण्यापासून मज्जाव करण्यात आला, सासरे संभाजी पाटील हे माझ्या बाजूने होते पण त्यांनी मला फोन करून सर्व कल्पना दिली होती, आता ते सुद्धा गेल्यामुळे माझेच जीवन धोक्यात आले आहे. असा आरोप करून पोलीस दलाने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी आमदार संभाजी पाटील यांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी हा वाद उफाळून आला आहे. त्यांची पत्नी उज्वला यांनी अनधिकृतपणे दुसऱ्याचे मूल आपल्या नावावर कसे खपवले याचे पुरावेही साधना यांनी बाहेर काढून खळबळ उडवली आहे, पुत्र सागर यांचे निधन झाल्यानंतर सुनेला न्याय दिला असता तर असे आरोप झाले नसते पण याकडे दुर्लक्ष झाल्याने आता प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून यामुळे पाटील कुटुंबाची सगळीकडे चर्चा होत आहे.
सून साधना यांनी पोलिसात तक्रार केल्याने आज सकाळी बेळगाव ग्रामीण चे पोलीस निरीक्षक शिवयोगी, एसीपी शिवा यांनी भेट देऊन पाहणी केली आहे, ज्यांच्यावर चाकू हल्ला झाला त्या रूपा झुंझवाडकर (वय 17) यांचा जबाब पोलिसांनी घेतला असून चौकशी सुरू आहे. आज संभाजी पाटील यांचे रक्षाविसर्जन झाले असून त्याच दिवशी हे वाद सुरू झाले आहेत.