लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 23 रोजी मतदान होणार आहे. मात्र प्रत्यक्षात मतदान किती होणार हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जोरदारपणे सुरू आहे. फेसबुक पेज व्हाट्सअप याद्वारे कोणता उमेदवार विजयी होणार? याची माहिती जाणून घेण्यावर समर्थक कामाला लागले आहेत. सध्या सोशल मीडिया वरून मतदानास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रमुख दोन उमेदवार पैकी कोण विजयी होणार यासंबंधी अनेकांचे यांचे मत नोंदविले जात आहे.
मागील काही निवडणुकांमध्ये प्रचाराचे हायटेक साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. संबंधित उमेदवाराची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत उपयुक्त वापर केला जात आहे. उमेदवार आणि पक्षाकडून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत असतानाच कार्यकर्तेही सोशल मीडियासाठी सरसावले आहेत.
काहींनी तर सोशल मीडिया वर कोणत्या उमेदवाराचा प्रचार कशा प्रकारे सुरू आहे. याची माहिती मिळवण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली आहे.काही कार्यकर्ते तर स्वतः सोशल मीडियावर प्रचाराच्या कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रत्यक्षात 23 रोजी होत असले तरी मतदाना आधीच सोशल मीडियावर मतदान जाणून घेण्यासाठी अनेकांची घाई-गडबड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरील प्रचाराने वेग घेतला आहे. चिकोडी व बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा कौल जाणून घेतला जात आहे. संबंधित उमेदवाराचे फोटो पोस्ट करण्यासाठी अनेकांची धांदल उडाली आहे. आपल्या पसंतीच्या उमेदवारा बाबत कोणती कमेंट येते यावर देखील अनेकांनी लक्ष ठेवले आहे.
सध्या लवकरच प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या तरी सोशल मीडियावर मात्र तरुणांचा कौल जाणून घेतला जात आहे. कोण चुकीच आहे आणि कोण योग्य आहे हे पटवून देण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार यांचे वाभाडे काढण्यात अनेक जण आघाडीवर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान आधीच सोशल मीडियावर तरुणांकडून मतदानाचा कौल जाणून घेतला जात आहे.